कला, विद्या व बुद्धीचे आराध्य दैवत श्री गणराय.. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासात गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व आहे.
दरवर्षी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत महाराष्ट्र राज्यात घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांच्या उत्सवाचे आयोजन होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य, स्वदेशी या ध्येयाच्या पूर्तीसाठी सामाजिक एकी आणि समाज संघटनासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
घरोघरी बसणाऱ्या बाप्पांचे सार्वजनिकरित्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आगमन होऊ लागले. याच गणेशोत्सवास काळाच्या ओघात सार्वत्रिक रूप प्राप्त होऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवांचा मानबिंदू ठरण्याचे भाग्य लाभले.
महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा जगभरातील गणेशभक्तांसाठी, पर्यटकांसाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी आकर्षणाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे.
मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री मा.श्री.ॲड.आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने, सन २०२५ पासून या गणेशोत्सवास 'राज्य उत्सव' हा दर्जा दिला आहे.
यानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे राज्य शासनाच्यावतीने आयोजन करण्यात येत आहे. तसेच घरोघरी आयोजित होणाऱ्या आणि प्रसिद्ध देवालयांमधील व उत्तमोत्तम सार्वजनिक गणपती उत्सवाचे दर्शन घरबसल्या घेण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
महागणेशोत्सवाच्या घरगुती गणपती दर्शन पटलावर आपले स्वागत आहे.